कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. याच्या निषेधार्थ आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज (रविवार) बिंदू चौकात  आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडी सरकार आणि गृहमंत्री यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले की,  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे वाझेसारख्या एपीआयकडे राज्याचे गृहमंत्री १०० कोटींची खंडणी गोळा करण्याबाबत सांगत आहेत.  तर, एकूणच गृहमंत्र्यांची तसेच महाराष्ट्र शासनाची ‘वर’कमाई किती असेल, असा जनतेला प्रश्न पडला आहे. शिवाय हे तिघाडी सरकारने अनैसर्गिक युती केल्यामुळे कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नाही. या तिघांनाही माहिती आहे, आपण कोणत्याही क्षणी जाणार आहे. त्यामुळेच शक्य तेवढे ओरबडण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे.   

याप्रसंगी भाजपचे सरचिटणीस दिलीप मेत्राणी, उपाध्यक्ष चंद्रकांत घाडगे, मारुती भागोजी, संजय सावंत, संतोष भिवटे, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय अग्रवाल, सचिन तोडकर, प्रदीप उलपे, मंडल अध्यक्ष संतोष माळी, भरत काळे, प्रदीप पंडे, ओंकार खराडे, आसावरी जोरदार, प्रज्ञा मालंडकर, नाशिक जिल्हा अध्यक्ष गिरीश पालवे, सचिन मुधाळे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.