गारगोटी (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकार सरकारने शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याच्या दृष्टीने २ लाख रुपयांची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र ५o हजार रुपयांचे सानुगृह अनुदान दिले जाईल, अशी घोषणा करुनही असे अनुदान अद्यापही दिलेले नाही.

याबाबत शासनाने एक परिपत्रक काढून जाचक अटी घातलेल्या आहेत. या अटी रद्द करून नियमित कर्ज फेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना ५o हजारांचे सानुग्रह अनुदान द्यावे, या मागणीसाठी १ जुलै या कृषिदिनी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती नाथाजी पाटील व अलकेश कांदळकर यांनी दिली.

सन २०१९-२० या आर्थिक वर्षात नियमित परतफेड करणारा शेतकरी यांच्या याद्या घेतल्या; पण सन २०१९ मधील महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यास जर नुकसानभरपाई मिळाली असेल तर अशा शेतकऱ्यांना या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देऊ नये, अशी अट घातली आहे. ही अट चुकीची असून, शेतकऱ्यांचे पूर्णतः कंबरडे मोडणारी आहे. या प्रकारामुळे भुदरगड तालुक्यातील जवळपास २० हजार शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहाणार आहेत.

आघाडी सरकारविरोधात १ जुलै रोजी कृषिदिनी एस.टी स्टँड गारगोटी येथे रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सहायक निबंधक भुदरगड यांना दिले. यावेळी अलकेश कांदळकर, संतोष पाटील, नामदेव चौगले, रणजित आडके, सुनील तेली, राहुल चौगले, अवधूत राणे, पांडुरंग वायदंडे, ए. डी. कांबळे, पी. बी. खुटाळे, ए. डी. कांबळे, आनंदा रेडेकर, सचिन हाळवणकर, उमेश देसाई, प्रसाद गुरव आदी उपस्थित होते.