शिंदे गटाच्या संरक्षणासाठी भाजप सतर्क

0
48

मुंबई (प्रातिनिधी) : एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या संरक्षणासाठी भाजपा सज्ज झालं आहे. शिवसेना उद्या आक्रमक झाली तर भाजप देखील देणार जशास तसे उत्तर देण्याची तयारी करत आहे. शिंदे गट उद्या मुंबईत येणार असल्याने शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे; मात्र या शिंदे गटातील आमदारांसाठी भाजपने देखील रस्त्यावर उतरण्याची तयारी केली.

शिंदे गटाच्या समर्थनासाठी आता छावा संघटना देखील रस्त्यावर उतरणार आहे. छावा संघटनेचे दोन हजार कार्यकर्ते रस्त्यावर येणार असून, उद्या विमानतळ ते विधानभवनापर्यंत आमदाराना संरक्षण देण्यात येणार आहे. ठाकरे गटातील आमदारांना मुंबईत पोहोचण्याचे मातोश्रीवरून आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी आपापल्या मतदारसंघात गेलेल्या आमदारांना मुंबईत बोलवले आहे. मतदारसंघात परतलेले सेनेचे आमदार संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहोचणार आहेत.

‘टपरीवाला कसा चुना लावतो ते वेळ आल्यानंतर त्यांना दाखवेन’, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. ३०२  काय असते, ४०  डिग्री तापमानात दिवसात ३५  कार्यकर्त्यांची लग्नं लावणे, रात्री १२ वाजता पण फोनवर उपलब्ध असणे काय असते राऊतांना माहिती नाही, असेही ते म्हणाले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप आणि शिंदेंच्या बंडाळीने राज्य सरकारला घेरल्याचे स्पष्ट आहे. फडणवीसांनी खेळी यामुळे यशस्वी होत असल्याचे दिसते; पण आता महाविकास आघाडीचे सगळे नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. पवारांच्या घरी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची खलबते सुरू आहेत.

आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.