मुंबई (प्रतिनिधी) :  केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणावरुन शिवसेना विरुद्ध भाजपा असा वादाचा नवा वाद सुरु झाला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यावेली शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ७५ हजार पत्रे लिहणार असल्याचे सांगितले.

शेलार म्हणाले की, नारायण राणे या आधीही त्यांच्या शैलीत बोलले आहेत, पण यावेळी सरकारचा आकांडतांडव करण्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांचे स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव दिनाचे अज्ञान उघड झाल्याचा थयथयाट असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.  मुख्यमंत्री ७५ वा अमृतमहोत्सव विसरतात, यासाठी भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, भारताचा स्वातंत्र्यदिनाचा ७५ वा अमृतमहोत्सव आहे, हे कृपया लक्षात ठेवा, अशा स्वरुपाची ७५ हजार पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे.

यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहणार नसेल तर पुढच्या टप्प्यात गांधीगिरी करुन पण फुले नाहीत तर काटे पाठवून त्यांना लक्षात राहण्याचा प्रयत्न भाजप करणार असल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे.