मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या पराभवाची कारणे भाजप शोधणार आहे. भाजप नेते आशिष शेलार, रविंद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुणे, औरंगाबाद, आणि विदर्भातील पराभवाच्या कारणांचा शोध पक्षाकडून घेतला जाणार आहे.

आशिष शेलार विदर्भातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील पराभवाची कारणे शोधणार आहेत. रविंद्र चव्हाण यांना पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या पराभवाचे कारण शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात जाऊन चिंतन करण्यास चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगण्यात आले आहे. आशिष शेलार, रविंद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन पराभवाची कारणे शोधतील. त्यानंतर औरंगाबाद, विदर्भ, पुण्याच्या पराभावाचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येणार आहे.

नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी प्रामुख्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. पुण्यातील दोन्ही जागा जिंकण्याचे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारले होते. दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याची जागा खेचून आणण्याचा विडा उचलला होता. मात्र पाचही जागांवर पक्षाला पराभवाचा फटका बसला. यासंबंधीचे चिंतन करण्यात येणार आहे.