इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळातील ग्राहकांची वीज बिले माफ करावीत, त्यांचे वीजेचे कनेक्शन तोडू नये. अशी मागणी करीत आज (शुक्रवार) इचलकरंजी वीज महावितरण कार्यालयासमोर भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

यावेळी वीज महावितरण कंपनीने ७५ लाख विज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवली आहे. कोरोना कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना अतोनात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, अनेकांचे व्यवसाय कोरोना संकट काळात बंद होते. याच काळात घरगुती, व्यावसायिक वीजबिले भरमसाठ आल्याने सर्वसामान्य नागरिकांनी गेली कित्येक दिवस बिले भरलेली नाहीत. महाविकास आघाडी सरकारने वारंवार विजबिलामध्ये सूट देण्याची आश्वासने दिली. परंतु प्रत्यक्षात या सरकारने कोणतीही सूट दिलेली नाही. सध्या बिल न भरणाऱ्यांचे विज कनेक्शन बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. तरी कोरोना कालावधीतील विज बिल माफ करावे. विज बिल न भरणाऱ्यांचे विज कनेक्शन तोडण्याचे धाडस करू नये. अन्यथा वीज महावितरण कार्यालयास टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष अनिल डाळ्या, सरचिटणीस अरुण कुंभार, अरविंद शर्मा, अमर कांबळे, विस्तारक राजेंद्र पाटील, धोंडीराम जावळे, नगरसेवक किसन शिंदे, अमृता भोसले, महिला अध्यक्षा पूनम जाधव, योगिता दाभोळे, शशिकांत मोहिते, आण्णा आवळे, पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह आदी उपस्थित होते.