कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपकडून महापालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. शहरातील सर्व ८१ प्रभागात पक्षातर्फे सूक्ष्म नियोजन केले जात आहे. त्यामुळे या वेळी सर्व प्रभागात भाजप पूर्ण तयारीनिशी आणि आत्मविश्वासाने निवडणुकीस सामोरे जाईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते आज (गुरुवार) भालचंद्र चिकोडे वाचनालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले की, महापालिका निवडणुकीसाठी सरकारी पातळीवरील तयारी संथ गतीने सुरू आहे. यामुळे जानेवारीत महापालिकेची निवडणूक लागेल, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजप तयारी करत आहे. कोरोना काळात रूग्णांच्या सोयीसाठी सर्व वार्डात एक डॉक्टर पक्षातर्फे नियुक्त करून मोफत उपचाराची सोय केली. शहरातील गरजूंना मदतीचा हात दिला जात आहे.

राऊतांना टोला

मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणारे राज्यपाल कोश्यारी हे संविधानातील ‘सेक्युलॅरिझम’ मानत नाहीत का, असा प्रश्न राऊत यांनी केला होता. त्यावर, ‘सर्वधर्मसमभावमध्ये हिंदू धर्म येत नाही का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आम्ही केवळ मंदिरे उघडा असे म्हटले नाही. सगळीच प्रार्थनास्थळ उघडा अशी आमची मागणी आहे. संजय राऊत हे फार विद्वान आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलणार, असेही ते म्हणाले.