आग्रा (वृत्तसंस्था) : छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना एका भाजप आमदाराने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी केली. तसेच येत्या काही दिवसात ताजमहालचे नाव राममहाल करण्यात येईल, असा खळबळजनक दावा भाजप आमदार सुरेंद्र सिंग यांनी केला आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आमदार सुरेंद्र सिंग उत्तर प्रदेशच्या बैरीया मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यांनी एका पत्रकार परिषदेत छ. शिवाजी महाराजांची तुलना योगी आदित्यनाथ यांच्याशी केली. शिवाजीचे वंशज उत्तर प्रदेशच्या भुमीत अवतरले आहेत. समर्थ रामदासांनी ज्याप्रमाणे भारताला शिवाजी दिला. त्याप्रमाणे गोरखनाथजींनी उत्तर प्रदेशाला योगी आदित्यानाथ दिला, असे त्यांनी म्हटले आहे. 

आग्र्यातील ताज महालच्या ठिकाणी आधी शंकराचे मंदिर होते, असा दावा करून त्यांनी आता ताजमहालचे नाव राममहाल करण्यात येणार आहे. हे काम योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातच करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, याआधी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केली होती. त्यावेळी सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली होती.