बारामतीत भाजप आमदाराने घेतली अजित पवारांची भेट

0
374

बारामती (प्रतिनिधी) : साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (रविवार) बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. विद्या प्रतिष्ठान संकुलातील व्हीआयआयटीमध्ये बंद खोलीमध्ये अजित पवार यांच्याशी त्यांनी पंधरा मिनिटे चर्चा केली. मागील काही दिवसातील त्यांची ही तिसरी भेट असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  

या भेटीनंतर मतदारसंघातील कामासंदर्भात अजित पवारांची भेट घेतल्याचे सांगून याबाबत अधिक बोलण्यास शिवेंद्रसिंहराजे यांनी नकार दिला. फक्त मतदारसंघातील कामासाठी आलो होतो, त्यात वेगळे काही नव्हते, असे सांगून ते तेथून निघून गेले. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे यांनी या भेटी संदर्भात अधिक माहिती दिलेली नसली, तरी बारामतीतून बेरजेचे राजकारण सुरु झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. पवार आणि भोसले यांच्यामध्ये आगामी सातारा जिल्हा बँक व सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. परंतु उभयतांमधील वाढती जवळीक बेरजेच्या राजकारणाचे संकेत देत आहे.