बलात्काराची तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मावर भाजप नेत्या संतापल्या   

0
149

मुंबई (प्रतिनिधी) : रेणू शर्मा  यांनी राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेला बलात्काराचा आरोप मागे घेतला आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत रेणूवर मुंबई पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वाघ यांनी ट्विट करत म्हटले आहे की, खोटे आरोप करणं, खोटे गुन्हे दाखल करणं चुकीचंच आहे. खोट्या आरोपांमुळे राजकीय कार्यकर्ता असूदे किंवा सामान्य माणूस तो उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही, आणि अशाप्रकारे जर महिला खोटे आरोप-गुन्हे दाखल करत असतील. तर त्यामुळे खऱ्या पीडित महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो. हे समाजाच्या हिताचं नाहीये. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खोटे आरोप लावणाऱ्या रेणू शर्मावर तात्काळ कारवाई करावी,  असे वाघ यांनी म्हटले आहे.

दरम्यन, मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा हिने गुरूवारी  मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली. कौटुंबिक कारणास्तव आणि प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगून पोलिसांना लेखी निवेदन दिले.