भाजप नेता म्हणतो, ‘मला पोलिसांनी उचलून फेकलं…’

0
49

मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना आज (बुधवार) रायगड पोलिसांनी अटक केली. गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यासह केंद्रातील भाजपा नेते आक्रमक झाले असून त्यांनी ठाकरे सरकारवर जहरी टीका केलीय. अर्णव गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग पोलीस ठाण्यात गेलो असताना पोलिसांनी परवानगी नाकारली आणि आपल्याला उचलून बाजूला फेकलं असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, आपण अर्णब गोस्वामी यांना कशा पद्धतीची वागणूक दिली जात आहे, पोलीस कशा पद्धतीने दादागिरी करत आहेत हे पाहण्यासाठी आलो होतो. फक्त पहात होतो तर पोलिसांनी उचलून मला बाजूला फेकलं याचा मी निषेध करतो. महाराष्ट्रात कोणताही नागरिक साधं लांब उभं राहून पाहूदेखील शकत नाही. पोलिसांच्या कामात अडथळा आणला नसतानाही ही कोणती दादागिरी आहे. पत्रकारांना जेलमध्य पाठवण्याची ठाकरे सरकारची मोहीम चालवली आहे, ही आणीबाणीची आठवण करुन देत असून त्याचा निषेध करतो.

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णव गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णव गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.