मुंबई (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी ‘इडी’ने शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांना नोटीस पाठवल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. मनी लॉड्रिंग प्रकरणी ‘एमएमआरडीए’ने त्यांना दिलासा दिला असला तरी भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी मात्र पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सरनाईक यांनी हौसिंग स्कीममध्ये सुमारे २५० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.  

किरीट सोमय्या यांनी इडीच्या कार्यालयात जाऊन यासंबंधी कागदपत्रेही सादर केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले की, प्रताप सरनाईक यांनी विहंग हाऊसिंग स्किममध्ये मोठा घोटाळा केला आहे. त्यांनी सुमारे २५० कोटी रुपये लाटले असून त्या कंपनीवर कारवाई देखील झाली होती. आता त्या कंपन्याच अस्तित्वातच नाहीयेत. प्रताप सरनाईक यांच्या नावाने ११२ सातबारा उतारे आहेत. त्यांनी कंपनीचं नाव देखील बदललं होतं. जप्त केलेल्या मालमत्तेचं नाव सातबारामध्ये नाही, अशी माहिती मी इडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. हा मोठा घोटाळा असून सरनाईक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.