हे सरकार सर्वसामान्यांचं की दारूवाल्यांचं..?

भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका

0
246

मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे सरकारने राज्यातील रेस्टॉरंट आणि बारमालकांना दिलासा देणारा मोठा निर्णय जाहीर केला आहे. परवाना शुल्कात ५० टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे त्यांच्यामधून समाधान व्यक्त होत असले, तरी यावरूनच भाजप नेत्या चित्र वाघ यांनी सरकारवर खरमरीत टीका केली आहे. लॉकडाऊनच्या वीजबिलामध्ये सवलत द्या, अशी मागणी करीत सर्वसामान्य नागरिक हा रस्त्यावर उतरला. मात्र, सरकारने सवलत दिली नाही. मात्र, रेस्टॉरंट आणि बारमालकांच्या परवाना शुल्कात कपात केली जाते. त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचे की दारुवाल्यांचं, असा सवाल त्यांनी केला आहे.

कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच मद्य उद्योगाला मोठा फटका बसला आहे. कोरोना काळात लॉकडाउन असताना राज्यातील परवानाधारक मद्यविक्रीची दुकानंही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे या बंद असलेल्या दुकानांच्या परवाना शुल्कात सूट देण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी आधीच परवाना शुल्काची रक्कम भरली आहे त्यांना ती पुढील आर्थिक वर्षात दिली जाईल असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

यावरुन चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्या म्हणतात, मंदिराच्या आधी बार उघडले. आता दारू परवान्यांवर थेट ५० टक्के सूट देण्याचा निर्णय तर मंत्रिमंडळाने घेतला आहे. करोनामुळे हॉटेल व्यावसायिक, छोटे-मोठे व्यापारी सर्वच त्रस्त झालेले आहेत. सरकारकडे वारंवार मागण्या करुनही त्यांना काही मिळत नाहीये. मग हे सरकार दारुवाल्यांवर मेहरबान का? की दारुवाले सरकारमधील काही मंत्र्यांवर मेहरबान आहेत याचा शोध घेण्याची गरज वाटते. सर्वसामान्य नागरिक हा रस्त्यावर उतरला. वीजबिलामध्ये सवलत द्या अशी मागणी केली. सरकारने सवलत दिली नाही. घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, कशामध्येच सर्वसामान्यांना दिलासा मिळाला नाही. हे सरकार गोरगरिबांचं आहे की दारुवाल्यांचं ?, दारुवाल्यांची सेवा हाच महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम आहे का, असें सवाल त्यांनी केले.