कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या  निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याच्या तक्रारी येत असून याबाबत निवेदने आणि हरकती देण्यात येत आहेत. कोल्हापूर शहर भाजपनेही अनेक भागात मतदार यादीत घोळ झाला असून संपूर्ण शहरातील प्रारूप मतदार यादी रद्द करावी अशी मागणी केली आहे. भाजपा संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्यावतीने आज (गुरुवार) उपायुक्त निखिल मोरे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. आतापर्यंत चार विभागीय कार्यालयात संपूर्ण शहरातून ९२ हरकती दाखल झाल्या आहेत.

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागवार प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून यातील अनेक प्रभागाच्या यादीमध्ये घोळ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने मूळ प्रभागातील मतदारांची नावे इतर प्रभागात समाविष्ट केली गेली आहेत. शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी काही भागात असा घोळ झाल्याचे आज पत्रकार परिषदेत सांगितले असतानाच आता कोल्हापूर शहर भाजपनेही हाच आरोप केला आहे.

भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक ४७, ४८, ४९, ३२, ३३, २७ आदी प्रभागात सीमारेषेवर असलेली नावे प्रभाग बदलून गेले असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यादी तपासणी आणि छाननीसाठी केवळ एकच दिवस दिला असल्यामुळे घाईगडबडीने या मतदार याद्या तयार करण्यात आल्या. त्यामुळेच यादीत घोळ झाला आहे. या याद्या पूर्णपणे रद्द कराव्यात, पुन्हा मतदार याद्या तयार करण्यासाठी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक वेळ द्यावा. याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत सध्या प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादी कार्यक्रम स्थगित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी चंद्रकांत घाटगे, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, संतोष माळी, अमोल पालोजी, दिनेश पसारे, विजय अग्रवाल, गिरीश साळोखे आदी उपस्थित होते.