कागल (प्रतिनिधी) : कागल तालुका भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ५३ जणांनी रक्तदान केले. शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी स्वतः रक्तदान करून या शिबिराचे उद्घाटन केले. येथील श्रीराम मंदिर सभाग्रहात जीवनधारा ब्लड बँकेच्या सहाय्याने रक्तदान शिबिर झाले.

वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र भाजप लाभार्थी सन्मान दिवस म्हणून साजरा करीत आहे. याचाच एक भाग म्हणून उज्ज्वला गॅस, पंतप्रधान किसान सम्मान निधि, वन रँक वन पेंशन, प्रधानमंत्री आवास अशा विविध योजनांमधील लाभ घेतलेल्या १०० हून अधिक  लाभार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी गोव्याचे प्रभारी निरीक्षक उदय प्रभूदेसाई, रंगनाथ कलगावकर, महादेव पालीयेकर, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, तालुकाध्यक्ष संजय पाटील, प्रताप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने, भूपाल पाटील, राजेंद्र जाधव, नंदकुमार माळकर, प्रताप पाटील, प्रवीण गुरव, शहराध्यक्ष सुशांत कालेकर, अरुण गुरव, जीवनधारा ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय उपाध्ये आदी उपस्थित होते.