पदवीधर निवडणुकीमुळे भाजप ‘चार्ज’

0
77

कोल्हापूर (समर्थ कशाळकर ): विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बॅकफूटवर गेलेल्या कोल्हापूर भाजपला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. गेल्या वर्षभरात आलेली मरगळ झटकून भाजप कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे.

वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर भाजपच्या गोटात नैराश्य पसरले होते. पाठोपाठ राज्यातील सत्तेपासून दूर राहावे लागल्यामुळेही थोडीशी अस्थिरता जाणवत होती. राज्य सरकारविरोधातील मंदिरे खुली करण्यासाठी झालेले आंदोलन वगळता अन्य कोणताही कार्यक्रम न झाल्यामुळे कार्यकर्ते थोडेसे आळसावले होते. पण पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच हे चित्र बदलले आहे. विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपचे सर्व कार्यकर्ते झटून काम करत आहेत.

पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याच्या जय्यत तयारीने महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने कार्यकर्त्यांना मायक्रो लेव्हलवर काम करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे दिसून येते. कोणत्याही परिस्थितीत आपला उमेदवार निवडून आणायचाच हा चंग बांधून भाजपचे कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून संपूर्ण जिल्हा पिंजून काढत आहेत.

ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्ते एकजुटीने काम करत असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पदवीधर मतदारसंघाबरोबरच आगामी महापालिका निवडणुकीचीही  पेरणी करण्यास भाजपने सुरुवात केल्याचे चित्र आहे.

एकंदरीत पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपला नवसंजीवनी देणारी ठरली आहे.