मुंबई (प्रतिनिधी) : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव समोर आलेले शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही,  अशी आक्रमक भूमिका भाजपने घेतली आहे. राठोड यांचा राजीनामा नाही घेतला, तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असे भाजप मुंबईचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले  आहे.  राठोड यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याची मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

भातखळकर यांनी म्हटले आहे की, एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये नाव समोर आल्याने मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करुन एफआयआर दाखल करण्याची गरज होती. मात्र राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कसली वाट पाहतंय?, बलात्कारी आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची पाठराखण करणारे हे सरकार आहे. पुण्यामध्ये आत्महत्या केलेली तरुणी आणि मंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप फिरत आहेत. तरी हे मंत्री उघड माथ्याने फिरत आहेत. यावर राज्यात काहीच होत नाही, हे खेदजनक आहे, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.