बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल

0
145

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला आहे.

कोल्हापुरातील टाकाळा परिसरात राहणाऱ्या केदार रानडे यांचे केदार कन्सल्टन्सी या नावाचे ताराबाई पार्क परिसरात कार्यालय आहे. रानडे याने वृत्तपत्रात जाहिरात देऊन मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत लोकांना बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. २०१७ मध्ये वर्तमानपत्रातील फसव्या जाहिरातीला भुलून याचं परिसरात राहणाऱ्या सुहास नागन्नावार यांनी रानडे याच्याकडे बिटकॉइनच्या माध्यमातून गुंतवणूक करायला सुरुवात केली. जुलै २०१७ ते ऑक्टोबर २०१७ या दरम्यान नागन्नावार यांनी जवळपास २० लाखांची बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, तीन वर्षात कोणत्याही प्रकारचा परतावा न मिळाल्याने नागन्नावर यांनी केदार कन्सल्टन्सीचे केदार रानडे यांच्यासह दोघांविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, केदार रानडे या संशयिताला यापूर्वी शाहूपुरी पोलिसानी फसवणूक प्रकरणी ताब्यात घेतले होते. आता पुन्हा केदार रानडे आणि अन्य दोघांविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने रानडे याच्या कारनाम्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वाढली आहे. पोलीस त्याचे गोव्यातील साथीदार अजय दौडमनी, सुकांता भौतिक या दोघांचा शोध घेत आहेत.