मुंबई (प्रतिनिधी) : वाढदिवस म्हणले की जरा विषय वेगळाच येतो. त्यात जर कुटुंबातील २ जणांचा वाढदिवस एकाच दिवशी आला तर तो नवल वाटण्यासारखा विषय बनतो. पण जर एकाच कुटुंबातील तब्बल ९ जणांचा वाढदिवस एकाच दिवशी आला तर..? होय हे आश्चर्य घडले आहे आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे.

वाढदिवस हा प्रत्येकाचा आवडीचा दिवस असतो आणि तो त्याच्यासाठी स्पेशलही असतो. वर्षातला हा दिवस संस्मरणीय प्रत्येकासाठी असतो. असं क्वचितच होतं की आपल्या घरातील दोन व्यक्तींचे वाढदिवस एकत्र येतात. पण एक असंही कुटुंब आहे, ज्यामधील तब्बल ९ सदस्यांचे वाढदिवस एकाच दिवशी येतात. या खास गोष्टीमुळेच या कुटुंबाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आलं आहे. ‘एका वृत्तवाहिनीने’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

पाकिस्तानातील लरकाना भागात राहणाऱ्या अमीर आझाद मांगी यांच्या कुटुंबातील जवळपास सर्वांचाच जन्म एकाच दिवशी झाला आहे. त्यांच्या कुटुंबात मांगी, त्यांची पत्नी आणि मुलांचा समावेश आहे. त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा वाढदिवस एकाच दिवशी येतो, हीच आधी सर्वांसाठी आश्चर्याची गोष्ट होती. या दोघांचा जन्म एक ऑगस्टला झाला होता. विशेष म्हणजे, मांगी यांचं लग्नही एक ऑगस्टलाच झालं होतं. त्याहून कहर म्हणजे, मांगी दाम्पत्याला झालेल्या सात मुलांचा जन्मदिवसही एकाच तारखेला झाला आहे. ती तारीख आहे एक ऑगस्ट. म्हणजेच, एक ऑगस्ट रोजी या कुटुंबात नऊ वाढदिवस आणि एक लग्नाचा वाढदिवस असे एकूण दहा वाढदिवस साजरे होतात.

मिळालेल्या माहितीनुसार, मांगी हे लरकाना भागात शिक्षक आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये सात मुलांचा समावेश आहे. यांपैकी चार मुलं जुळी आहेत. सिंधु, सुसई, आमिर, अम्मार, अहमर, सपना आणि अंबर अशी या सात मुलांची नावं आहेत. यांमधील दोन मुलं आणि दोन मुली जुळी आहेत. या वैशिष्ट्यामुळे या कुटुंबाचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.