कोल्हापुरातील मृत पक्ष्यांचे बर्ड फ्लू चाचणी अहवाल निगेटिव्ह, पण…

0
72

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यात कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव येथे दोन पाणबदके व सरनाईक कॉलनी येथे एक कबुतर, गडहिंग्लज शहरात दोन कावळे व मौजे तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे एक कावळा मृत आढळून आला होता. रोगनिदानाकरिता हे मृत पक्षी पुणे जिल्ह्यातील औंध येथील विभागीय रोग अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात आले होते. या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला नसल्याचे अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. के. पवार यांनी पत्रकाद्वारे दिली.

पत्रकात म्हटले आहे की, सदरचे वन्य पक्षी व कावळे, कबुतरांच्या मृत्युमुळे कुक्कुट पक्षीपालकांच्या मनात बड्ड फ्लूबाबत धास्ती निर्माण झाली होती. सदर नमुन्याचे रोग निदान बर्ड फ्लू नकारार्थी आल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र, रंकाळा येथील २ नर पाणबदकांचा मृत्यू इतर कोणत्या कारणामुळे झाला असावा या बाबत प्रत्यक्ष शवविच्छेदन करणाऱ्या शास्त्रज्ञास विचारणा केली असता धक्कादायक बाब समोर आली असून पाणबदकांचा मृत्यू हा कुरकुरे, चिप्स खाल्यामुळे Sever Acidosis मुळे झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.