बर्ड फ्लूची महाराष्ट्रात एन्ट्री ? : ठाण्यात सापडले मृत पक्षी

0
412
(संग्रहित छायाचित्र)

ठाणे (प्रतिनिधी) : पंजाब, राजस्थान, झारखंड आणि मध्य प्रदेश या चार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत पक्षी सापडत आहेत. पंजाब, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये बर्ड फ्लूबाबत अलर्टही (bird flu alert) जारी करण्यात आला आहे. ही घटना ताजी असताना ठाण्यातील विजय गार्डन्स या सोसायटीत अनेक पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

पाणबगळा जातीतील हे पक्षी सकाळपासून रस्त्यावर मृतावस्थेत पडून होते. एकूण १४ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरले आहे. स्थानिकांनी या घटनेबद्दल पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी यांना बोलावून माहिती दिली. त्यानंतर ठाणे पालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व मृत पक्ष्यांना ताब्यात घेतले. या सर्व पक्ष्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.