नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूच्या निलगिरी हिल्समध्ये ८ डिसेंबररोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. या हेलिकॉप्टर अपघाताबाबतचा तपास अहवाल हवाई दलाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना सादर केला. या अहवालात खराब हवामानामुळे अपघात झाल्याचे म्हटले आहे.

अपघाताच्या दिवशी विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान हे Mi-17V5 हेलिकॉप्टरचे पायलट होते. अपघाताच्या आठ मिनिटांपूर्वी त्यांनी हेलिकॉप्टर लँड करत असल्याचे सांगितले होते. पायलट हेलिकॉप्टर अगदी खाली उडवत होते. जमिनीपासून ५००-६०० मीटर उंचीवर ढगांचा जाड थर होता आणि त्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती, असे सांगून हेलिकॉप्टरमध्ये काही गडबड असण्याची शक्यता नाकारण्यात आली आहे.

दरम्यान, या अहवालाबाबत राजनाथ सिंह यांना ४५ मिनिटांचे प्रेझेंटेशन देण्यात आले. अपघाताच्या कारणाबाबतच्या अहवालात भविष्यात व्हीआयपींसोबत उडणाऱ्या हेलिकॉप्टरबाबत महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरबाबत तपास पथकाने एसओपीमध्ये बदल सुचवले आहेत.