मेरठ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वपक्षीयांची उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याची लगबग सुरू असताना हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार अर्चना गौतम यांचे बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात गरमागरम चर्चांना उधाण आले आहे. यावर अर्चना गौतम यांनी टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसच्या उमेदवार अर्चना गौतम यांनी या फोटोबाबत खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी मिस बिकिनी २०१८ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मी मिस उत्तर प्रदेश २०१४ आणि मिस कॉस्मो वर्ल्ड २०१८ चा किताब पटकावला आहे. त्यामुळे मी लोकांना आवाहन करते की, माझा प्रोफेशन आणि राजकीय करियरला एकत्र करू नका.

दरम्यान, १३ जानेवारीरोजी काँग्रेसने यूपी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची  पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये अर्चना गौतम यांना हस्तिनापूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. त्यानंतर त्यांचे बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहेत. आता यावर स्पष्टीकरण देत त्यांनी टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने १२५ उमेदवारांची पहिल्या यादी जाहीर केली आहे. यामध्ये ४० टक्के महिला आणि ४० टक्के तरुणांना  उमेदवारांना देण्यात आली आहे.