कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात कृषी अवजार वाटपात मोठा घोटाळा असून तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर  कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कृषीमंत्री दादासो भुसे यांच्याकडे केली. तसेच लॉकडाऊन करायचे असेल तर शेतमालाच्या वितरण व्यवस्थेची व्यवस्था करावी,  शेतमालाचे दर पडणार नाहीत  याची खात्री द्यावी, अशी मागणी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्याकडे केली.

यावेळी शेट्टी म्हणाले की,  राज्यातील कृषि विभागात सर्वत्र सावळा गोंधळ सुरू आहे. राज्य शासनाने विकत घेतलेली सुमारे ८५ हजार अवजारे राज्यातील कृषि अधीक्षकांनी संबंधित शेतकर्‍यांना वाटलेल्या नाहीत. अत्यल्प भूधारक, आदिवासी, मागासवर्गीय, साधारण गटातील शेतकर्‍यांना देण्यासाठी कृषि अवजारे मंजूर केलेली आहेत. त्यासाठी जिल्हानिहाय अनुदान देखील दिले आहे. मात्र ती शेतकर्‍यांच्या पर्यंत पोहचलेली नाहीत. ही अवजारे शेतकर्‍यांच्यासाठी होती की अधिकारी, ठेकेदारांनी पोसण्यासाठी होती असा प्रश्न निर्माण झाला आहे. बोगस बिले घेऊन अनुदान लाटल्याचे धक्कादायक प्रकार अनेक जिल्ह्यांत घडलेले आहे. काही प्रकरणात तर अवजारे चोरीस गेल्याचे नमूद केले आहे. अशा बाबी धक्कादायक असून राज्य शासनाची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. सदर प्रकरणाकडे आपण गांभिर्याने लक्ष घालून या प्रकरणाची सखोल तपासणी करून दोषी व्यक्तींवर कडक कारवाई केली जावी. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्याचे संकेत राज्य सरकारकडून वारंवार दिले जात आहेत. अचानक लॉकडाऊन झाले तर वाहतूक व्यवस्था ठप्प होईल, या भितीने खरेदीदार शेतीमाल उचलेना झालेत. या संदर्भात राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी. शेतीमालाच्या वितरण व्यवस्थेसंदर्भात सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच शेतमालाचे दर पडणार नाहीत, याचीही खबरदारी घ्यावी, अन्यथा पुन्हा राज्यातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करतील. असा इशाराही यावेळी देण्यात आला.