नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेन्शनधारकांसाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक असते. अन्यथा पेन्शन मिळण्यात अडथळा येईल. नोव्हेंबरमध्ये हे तुमच्या हयात असण्याचा दाखल अर्थात जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागते. ऑफलाइन पद्धतीने लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याचा कालावधी १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत आहे. मात्र, ऑनलाइन माध्यमातून कधीही लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता. सर्टिफिकेट जमा केल्यानंतर वर्षभरासाठी हे जीवन प्रमाणपत्र वैध असते.

लाईफ सर्टिफिकेट अर्थात जीवन प्रमाणपत्र म्हणजे पेन्शनधारक जिवंत असल्याचा पुरावा असतो. पेन्शनधारकांना बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे सर्टिफिकेट जमा करावे लागते. मात्र, आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्याच हे सर्टिफिकेट जमा करता यावे याकरता ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली आहे.हे सर्टिफिकेट जमा करण्याची सुविधा एसबीआयकडून देखील ऑनलाइन पद्धतीने देण्यात आली आहे.

बँकेने अशी माहिती दिली आहे की याकरता तुम्ही pensionseva.sbi ची साहाय्यता घेऊ शकता. त्याशिवाय तुम्ही उमंग अॅपच्या साहाय्याने देखील हे काम करू शकता. आधार सेंटर किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून लाइफ सर्टिफिकेट सबमिट करता येईल. याशिवाय जे पेन्शनर बँकेत जाऊ शकत नाही ते कोणत्याही मॅजिस्ट्रेट किंवा गॅझेटेड ऑफिसरकडून स्वाक्षरी घेऊन लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकतात.