‘भूमी अभिलेख’कडून प्रॉपर्टी कार्डमध्ये मोठ्या चुका : मनसेचा आरोप

0
72

कळे (प्रतिनिधी) : भूमी अभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्डमध्ये नोंदी करताना खूप चुका केल्याचा आरोप करीत त्या  लवकरात लवकर दुरुस्त व्हाव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे. आज (बुधवार) जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, बालिंगा (ता. करवीर) गावातील प्रॉपर्टी कार्ड करतेवेळी भूमी अभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्डमध्ये नोंदी करताना खूपच चुका केल्या आहेत. एका भावाची प्रॉपर्टी दुसऱ्या भावाच्या नावावर, खासगी जागेवर सरकारचे नाव, सरकारी जागेवर इतरांची नावे असा घोळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आजपर्यंत जवळपास सत्तर तक्रारी दाखल झाल्या आहेत. या चुकीच्या नोंदीमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व प्रॉपर्टीकार्ड नोंदणी रद्द करुन पुन्हा नवीन प्रॉपर्टीकार्ड तयार करावीत. याबाबत भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन दुरुस्तीचे आदेश द्यावेत.