अहमदाबाद (वृत्तसंस्था) :  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आज (गुरूवार) अहमदाबाद येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आयपीएलमध्ये आणखी दोन संघाचा समावेश करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आयपीएल २०२२ मधील हंगामापासून हे दोन संघ सहभागी होतील. सध्या ८ संघ असून  आता १० संघ होतील.   

या सभेत २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना (आयसीसी) आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीसोबत चर्चा करूनच याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे ठरले.  आयपीएलमध्ये दोन संघांचा समावेश करण्यात आल्याने चुरस वाढणार आहे. तसेच सामन्यांची संख्याही वाढणार असल्याने स्पर्धेचे कालावधी वाढणार आहे. या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेक महत्त्वापूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.