नवी दिल्ली (प्रतिनिधी) : पश्चिम बंगालपाठोपाठ मध्य प्रदेश सरकारनेही सर्व सरकारी आणि खासगी शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्रोजेक्टच्या आधारावर केले जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री इंद्रसिंह परमार यांनी दिली.

परमार यांनी सांगितले की, यावर्षी ५ वी व ८ वीच्या बोर्डाच्या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश सरकारने यापूर्वीच १ ली ते ८ वीपर्यंतचे वर्ग ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल. प्रोजेक्ट मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल.

दरम्यान, दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येणार असून लवकरच वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. इयत्ता ९ ते ११ वीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शाळेत येण्यास सांगितले जाईल.