मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी थकीत आहेत. त्यामुळे ते भागविण्यासाठी एसटी महामंडळाने २ हजार कोटींचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एसटीचे काही आगार, बस स्थानक तारण ठेवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी  एसटी कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत. त्याचबरोबर एसटी महामंडळाला इतर देणीही द्यायची आहेत. त्यासाठी कर्ज काढण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

भाजप सरकारच्या काळात घेतलेले १७०० कोटींचे कर्ज तब्बल ५ हजार कोटींवर गेले होते. त्यानंतर लॉकडाऊन लागू झाल्यानंतर एसटीचे  अर्थचक्र रूतले होते. त्यामुळे  कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी महामंडळाने राज्य सरकारकडून निधी घेतला. परंतु, सध्या राज्य सरकारही आर्थिक अडचणीत आले असून सरकारच्या डोक्यावर ६ लाख कोटींचा बोजा पडला आहे. कोरोना, अतिवृष्टी, यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आल्याने कर्जाची उभारणी करण्यासाठी एसटी महामंडळाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.