मुंबई (प्रतिनिधी) : मोबाईल रिचार्ज, वीजबिल किंवा इतर बिले आपोआप भरली जाणार नाहीत. कारण १ एप्रिलपासून डिजिटल पेमेंटच्या नियमात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बदल केला आहे. आयआरबीने ऑटो डेबिट पेमेंटच्या सेवेसाठी ‘अ‍ॅडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन’चा आणखी एक पर्याय उपलब्ध केला आहे. यामुळे   दरमहा परस्पर ग्राहकांच्या बँक खात्यामधून ठराविक पैसे कट होण्याची पद्धत बंद होणार आहे. तसेच ग्राहकांच्या परवानगीशिवाय ऑटोमेटिक पेमेंट होणार नाही.

नव्या नियमांनुसार बँका ऑटो डेबिट पेमेंटच्या निर्धारित तारखेच्या पाच दिवस आधी ग्राहकांना संदेश पाठवतील. संबंधित प्लॅटफॉर्मसाठीची रक्कम देण्यास ग्राहकाकडून परवानगी मिळाल्यानंतरच ती रक्कम त्याच्या खात्यातून वजा होईल. याशिवाय, बिलाची रक्कम पाच हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास बँकेकडून ग्राहकांना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ‘ओटीपी’ पाठवावा लागेल.

एक एप्रिलपासून दरमहा शुल्क आकारण्यासाठी राबविण्यात येणारी ‘ऑटो डेबिट’ प्रणाली बंद होणार आहे. ग्राहकहिताचा विचार करून रिझर्व्ह बँकेने या संबंधी नियमात बदल केला आहे. या निर्णयाचा फायदा केवळ ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मच्या ग्राहकांनाच न होता मोबाईल बिल किंवा अन्य बिलांसाठीही होणार आहे. ‘ऑटो डेबिट’ व्यवहारांवर ‘अ‍ॅडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन’चा नवीन पर्याय सुरू करणार असल्याचे आरबीआयने यापूर्वी नमूद केले होते.  जर यामध्ये बँकांनी योग्य ते बदल केले नाहीत, तर ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवठादाराच्या वेबसाईटवर किंवा इतर पेमेंट संकेतस्थळांवर जाऊन पेमेंट करावे लागणार आहे.