बिद्री (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री. दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ ६ नोव्हेंबर रोजी केला जाणार आहे. गळीताला येणाऱ्या प्रतिटन ऊसाला एफआरपी नुसार ३०५६ रुपये दर एकरक्कमी दिला जाईल. हा दर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीत सर्वाधिक आहे. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी आज (बुधावर) पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले की, बिद्री साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ या गतगळीत हंगामात ६ लाख ८० हजार ४२७ मे. टन ऊसाचे गाळप करुन ८ लाख ६५ हजार ६०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १२.७२ टक्के मिळाला आहे. त्यानुसार कारखान्याची एफआरपी  ३०५५.१७ रुपये इतकी होते. मात्र, कारखान्याने हि रक्कम ३०५६ रुपये इतकी देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने कायमपणे एकरक्कमी एफआरपी दिली असून इतर कारखान्यांच्या तुलनेत नेहमीच १०० ते १५० रुपये जास्त राहिली आहे. यंदाही ही प्रथा कायम राखली जाईल.

येत्या हंगामासाठी १३ हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली असून यामधून कारखान्यास १० लाख मे. टन ऊसाची उपलब्धता होईल. वाढीव विस्तारीकरणामुळे कार्यक्षेत्रातील सर्व ऊस लवकरात लवकर गाळप करण्याचा मानस असून ऊस उत्पादकांनी सर्व ऊस कारखान्यास पाठवून जिल्ह्यातील सर्वाधिक दराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

यावेळी संचालक गणपती फराकटे, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, प्रविणसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, धोंडीराम मगदुम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, प्रविण भोसले, मधुकर देसाई, के.ना.पाटील, अशोक कांबळे आदी उपस्थित होते.