गांधीनगर (वृत्तसंस्था) : गांधीनगर येथील राजभवनातील एका छोटेखानी कार्यक्रमात भूपेंद्र पटेल यांनी आज (सोमवार) राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विजय रुपानी यांच्या राजीनाम्यानंतर रविवारी पक्षाने भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते.

पटेल हे सरदारधामच्या विश्वस्तांपैकी एक आहेत, ज्यांनी पाटीदार समाजाचे आंदोलन उभे केले होते. विजय रुपानी यांच्या राजीनाम्यानंतर पाटीदार समाजाच्या एक गठ्ठा मतांसाठी नवीन मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांना पसंती दिल्याचे  बोलले जात आहे. २०१७ च्या निवडणुकीत पाटीदार आंदोलनामुळे भाजपला मोठा त्रास झाला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पाटीदार समाजाला पक्षाकडे वळवून मार्ग सुलभ करण्याचा पक्षाच्या वरीष्ठ नेतृत्वाने प्रयत्न केल्याचे दिसून येते. दरम्यान, मंत्रिमंडळात दुसरा कोणताही बदल करण्यात आलेला नाही.