आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावचे वीर सुपुत्र, जे भारत मातेच्या रक्षणार्थ धारातीर्थी आणि शहीद झाले. अशा वीर जवानाच्या घरी भारतीय जनता पार्टीचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आज (रविवार) बहीण भावाचे नाते जपले. आणि शहीद हृषिकेश जोंधळे यांच्या बहिणीकडून राखी बांधून घेतली. यावेळी बहीण कल्याणी जोंधळे हिला दुचाकी आणि लॅपटॉप ओवाळणी म्हणून दिली.   

महेश लांडगे म्हणाले की, कोल्हापूरच्या मातीशी माझ्या कुटुंबाचे विशेष नाते आहे. मी कसबा बावड्याच्या शासकीय कुस्ती केंद्रामध्ये उत्तमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले आहेत. कल्याणी जोंधळे हिला भाऊबीजेच्या दिवशी स्वत:चा भाऊ गमवावा लागला. मी आमदार असो किंवा नसो, हा भाऊ तुझ्या मदतीला धावून येईल. शिक्षण, नोकरी आणि आयुष्यातील प्रत्येक वळणावर सोबत राहील, असे आ. लांडगे यांनी यावेळी सांगितले.

कल्याणीचे इंटेरिअर डिझाईनचे शिक्षण झाले आहे. नुकतेच तिचे लग्नही ठरले आहे. तिचे होणारे पती सिव्हिल इंजिनिअर आहेत. कल्याणीच्या लग्नासाठी आणि पुढील शिक्षणासाठी सर्वोतपरी मदत करणार असल्याचे आ. लांडगे यांनी सांगितले.

यावेळी कल्याणीचे वडील रामचंद्र जोंधळे, कोल्हापूर जिल्हा आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष खांडेकर, कागल तालुका आजी-माजी संघटनेचे अध्यक्ष आनंदा पाटील, सदस्य बाजीराव पवार, प्रभाकर पाटील, विजयकुमार पाटील, मोहन कांबळे आदी उपस्थित होते.