पन्हाळ्याच्या नाल्या हैदर मशिदीमध्ये भजन उत्साहात

0
268

पन्हाळा (प्रतिनिधी) : नगारा, ताशाच्या वाद्यमय वातावरणात पन्हाळसह परिसरात मोहरमला उत्साहात सुरुवात झाली. पन्हाळा येथील हजरतपीर शहादुद्दीन दर्गामध्ये पंजातन पंजांची, मुतवली पंजा व बाराईमाम मशिद येथे बार पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

पन्हाळ्यातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या नाल्या हैदर पंजा, नाल्या हैदर मशिदीमधील बुरूड पंजा, अंबिलढोक पंजाची व बाराईमाम येथेही कुमार गवंडी यांचा अली जुल्फिकार पंजा, कासे पंजा, शेक पंजा, तर हैदर मशिद येथे गारदी पंजा, आगा पंजा, भोसले गल्ली येथील भोसले पंजा, बाजीप्रभू पुतळा येथील कांबळे पंजा, मोकाशी पंजा यांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हिंदू-मुस्लिम ऐकायचे प्रतीक असलेल्या नाल्या हैदर पंजा मशीद येथे महालक्ष्मी भजनी मंडळाचे भजन झाले.

पन्हाळ्यासह परिसरातील पावनगड, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, आपटी, रविवार पेठ, नेबापूर, रामापूर येथेही पीरपंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आजपासून सर्व पंजे दर्शनासाठी खुले होणार आहेत. दि. ७ रोजी पंजे भेटींचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी मंगळवार पेठ, रामापूर येथील पंजांबरोबर कोल्हापुरातील दिलबहार मंडळांचा पंजा, बाबूजमाल तालीम मंडळाचा पंजा, घिसाड गल्लीचा पंजा  जिल्ह्यातील आदी गावांतील पंजे भेटीसाठी पन्हाळ्यात दाखल होतात.

दि. ८ रोजी खत्तल रात्र साजरी करण्यात येणार आहे. दि. ९ रोजी मोहरमची सांगता होऊन दफन विधीचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती हरून अब्दाल व हनिफ नगारजी यांनी दिली. मोहरम सणानिमित्त पंजांना रोट व चौंगे या खाद्यपदार्थांचा नैवेद्य दाखविले जातात. त्यामुळे महिला वर्गांत रोट व चौंगे तयार करण्याती लगबग सुरु आहे.