विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात शिवाजी चौकात घंटानाद आंदोलन

0
125

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झाल्याने विशाळगडावर सुमारे ६४ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. त्याकडे पुरातत्त्व खाते आणि जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. याच्या निषेधार्थ विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीच्या वतीने शिवाजी चौकात आज (शुक्रवार) घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी विशाळगडावरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणार्‍या पुरातत्व खात्याचा धिक्कार असो, अशा घोषणांनी शिवाजी चौक परिसर दणाणून गेला. 

विशाळगडावरील प्राचीन मंदिरे आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी अत्यंत दुर्लक्षित आहेत. छ.   शिवरायांच्या सुनबाई अहिल्याबाई भोसले यांची समाधीही अत्यंत दुर्लक्षित आहे. याउलट गडावर रेहान बाबा दर्ग्याच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी उपलब्ध होत आहे. तरी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तत्काळ हटवून दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा. गडावरील ऐतिहासिक स्मारके, विविध नरवीरांच्या समाधी अन् मंदिरे यांचा कालमर्यादा ठेवून जीर्णोद्धार करा, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात प्रवक्ता सुनील घनवट, समन्वयक किरण दुसे, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, प्रमोद सावंत, किशोर घाडगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव,  संभाजीराव भोकरे, हिंदू एकता आंदोलनाचे चंद्रकांत बराले, बापू वडगावकर, विजय आरेकर यांच्यासह विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.