कोल्हापूर  (प्रतिनिधी) : ‘चंद्रसूर्य असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील, अशी दर्पोक्ती करणाऱ्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. ‘चंद्रसूर्याचं कशाला घेऊन बसलात? तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे.

संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात १ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे सर्व मंत्री  आज (रविवार) काळ्या फिती बांधून काम करत आहे.

या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ म्हणाले की,  कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर सतत करत असलेला अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी त्यांना समजावून सांगावे.  राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आज काळ्या फिती बांधून सीमाभागातील मराठी बांधवांना आपला पाठिंबा द्यावा. सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज बुलंद करू,  दडपशाहीचा धिक्कार करू,  असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे.