गिर्‍हाईक न बनता सजग ग्राहक व्हा : प्रा. एस. एन. पाटील

0
201

गगनबावडा (प्रतिनिधी) : गिर्‍हाईक न बनता सजग ग्राहक व्हावे, यासाठी संघटित व्हा, संस्थेचे सभासद व्हा, असे आवाहन प्रा. एस. एन. पाटील यांनी केले. 

भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायत समितीचे संस्थापक स्व. बिंदू माधव जोशी स्थापित आणि शासन मान्य असलेल्या ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ या संस्थेची गगनबावडा तालुका शाखा स्थापन करण्यासंदर्भात दुसरी बैठक शुक्रवारी पंत अमात्य जहागीरदार यांच्या पळसंबे येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रा. पाटील बोलत होते. सांगशी-सैतवडे येथील सरपंच भास्कर माने यांनी, प्रमुख पाहुणे प्रा. एस. एन. पाटील यांची या चळवळीतील तळमळ आणि कार्याची माहिती दिली.

प्रा. एस. एम. पाटील म्हणाले, ‘ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा असून, आज ग्राहकाची अनेक प्रकारे फसवणूक, अडवणूक होत आहे. ग्राहकांचे संघटन, ग्राहकांचे प्रबोधन आणि ग्राहकाना योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. ग्राहकाच्या हक्क आणि अधिकारासाठी कार्य करणारे ग्राहक पंचायत महाराष्ट्र एक अग्रगण्य संस्था आहे. यावेळी त्यांनी ग्राहकांची फसवणूक की कशी होते, याबाबत अनेक उदाहरणे सांगितली.

राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम घेतले जात नाहीत याची खंत पाटील यांनी बोलून दाखवली. यावेळी विलास पाटील, टी. एच. पडवळ, कुंडलिक जाधव, सरदार पाटील, सुरेश केसरकर, संतोष येडगे, जयसिंग गायकवाड, परेश भारती, बारकू केसरकर, सखाराम गावकर, कृष्णात यादव यांच्यासह तालुक्यातील ४६ वाड्यावस्त्यातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.