राजाराम कारखान्यात परिवर्तनासाठी सज्ज राहा : सतेज पाटील

0
124

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती राजाराम कारखान्याची होणारी सभा ही महादेवराव महाडिक गटाची शेवटची सभा आहे. ही सभा व्यवस्थित पार पाडून समाधानाने त्यांना घरी पाठवूया आणि परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज राहूया तसेच राजाराम कारखान्याच्या सात-बाऱ्यावर अमल महाडिक याचे नाव लावायचे नसेल तर परिवर्तन घडवूया असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. ते श्रीराम सोसायटी कसबा बावडा येथे छत्रपती राजाराम साखर कारखाना सभासदांच्या बैठकी प्रसंगी बोलत होते.

आगामी काळात राजाराम कारखान्याचे निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. तत्पूर्वी ३० रोजी कारखान्याची वार्षिक सभा होणार आहे. आ. पाटील यांनी, राजाराम साखर कारखान्याचे १३४६ सभासद न्यायालयाने अपात्र ठरविले. हे बोगस सभासद अपात्र करण्यासाठी न्यायालयात झालेल्या त्रासाबाबत आ. सतेज पाटील यांनी सभासदांना माहिती दिली. दि. ३० रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत महाडिक गटाकडून गोंधळ घालण्याची व्यवरचना सुरू आहे. सभेला आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. सभेमध्ये बाहेरील माणसं आणून जर सामान्य सभासदांना त्रास दिलात तर जशास तसे उत्तर देऊ. सभा झाल्यावर बावड्यातून बाहेर जाणे महाग होईल, असा इशाराही आ. पाटील यांनी दिला.

गेले २५ वर्षे महादेव महाडिकाच्या बरोबर आम्ही कारखान्यात काम केले; मात्र आम्हाला नावाला ठेवले. आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घ्यायचेत. सभासदांला भूलथापा लावून व्यापाऱ्याने आपले भले करून घेतले असल्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने यांनी सांगितले. कारखाना कार्यक्षेत्राच्या लगतच्या गावातल्या सभासदांना कुठलाही सहकारमधला फायदा दिला नाही. शेतकरी व सभासदांना गोड बोलून व्यापाऱ्यांनी कारखाना ताब्यात घेतला. हा कारखाना व्यापाऱ्याच्या हातातून काढून घेऊन सामान्य शेतकऱ्यांच्या हक्काचा व्हावा. या लढ्यासाठी आम्ही सर्वजण आ. पाटील यांच्या पाठीशी राहू, असे मत जि.प.चे माजी सदस्य बाजीराव पाटील यांनी व्यक्त केले.

आ. ऋतुराज पाटील, श्रीराम सोसायटीचे चेअरमन हिंदुराव ठोंबरे, गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, शशिकांत चुयेकर, एस आर पाटील, बायजी शेळके, प्रकाश पाटील, विजयसिंह मोरे, शरद साखरचे संचालक अभिजित भंडारी, उत्तम सावंत, धनराज घाटगे आणि सभासद उपस्थित होते.