मुंबई (प्रतिनिधी) : राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे, आवाज काढणे खूप झाले. आता मॅच्युअर व्हा आणि संघटनात्मक काम करा, असा टोला खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत आयोजित पक्षाच्या गट अध्यक्षांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की, ‘राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे, आम्हाला मिमिक्री पाहायची असेल तर जॉनी लिव्हर यांची ओरिजनल मिमिक्री पाहू. राजकारणात आता अजून किती दिवस आवाज काढत बसणार? आवाज काढणे आता खूप झाले. याच्या पलिकडे पाहायला हवे. संपूर्ण महाराष्ट्र पाहा. उद्धव ठाकरेंवर टीका करुन तुमचे राजकारण किती दिवस चालणार? आमच्यावर इतकी संकटे आलेली आहेत तरी आम्ही लढत आहोत.’

संजय राऊत यांनी भाजपावरही निशाणा साधला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान केला जात आहे. आमच्या आराध्य दैवतांचा भाजपाच्या आराध्य दैवतांकडून अपमान होतोय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राष्ट्रीय प्रवक्ते हे अपमान करत आहेत. ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, त्या पद्धतीने आम्ही हा विषय बाजूला करू असे त्यांना वाटत असेल. कर्नाटकाकडून महाराष्ट्राचा अपमान होत आहे. विरोधी पक्षाचा अॅक्शन प्लॅन रेडी आहे. पण सध्या आम्ही वाट पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका अपमान होऊन सुद्धा हे सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे मंत्रिमंडळ, आमदार, जे स्वाभिमानाच्या गोष्टी करून गेले. हे अजून हात चोळत बसले आहेत.’, असेही ते म्हणाले.