सावधान..! पालिकेची सोमवारपासून जप्तीची कारवाई

0
138

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्यावतीने सोमवारी (दि. ८) पासून संपूर्ण महापालिका हद्दीमधील अनाधिकृत केबीन्स, फेरीवाले आणि अतिक्रमण केलेल्या दुकानदार, व्यावसायिकांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. अतिक्रमण विभागामार्फत ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

यामध्ये दुकानदार, व्यावसायिक, फेरीवाले यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात येणार आहे. याचबरोबर जे फेरीवाले अनाधिकृत केबीन लावून व्यवसाय करतात अशा सर्व फेरीवाले यांची केबीन जप्त करणेची कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील मंदीरे, हॉस्पीटल या परिसरातील १०० मीटरमधील अतिक्रमणेही काढण्यात येणार आहेत. संबधीतांनी त्यांची अतिक्रमणे स्वत:हून रविवारपूर्वी काढून घ्यावीत. अन्यथा ८ फेब्रुवारीपासून अतिक्रमण निर्मुलन मोहिममध्ये सर्व अतिक्रमण केलेले साहित्य जप्त केले जाईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.