कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासन जोरदार प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून मास्क न वापरणाऱ्यांकडून काल (मंगळवारी) एका दिवसात तब्बल ६४ हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

त्या म्हणाल्या, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न राखणे, हॅण्डग्लोज न वापरणे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी प्रशासनाकडून व्यापक कारवाईची मोहीम राबवण्यात आली आहे. यामध्ये विनामास्क फिरणाऱ्या ५५१ जणांकडून ५५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सामाजिक अंतर न ठेवल्याबददल ९ जणांकडून ४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. मास्क तसेच हॅण्डग्लोज न वापरल्याबददल १९ जणांकडून ३ हजार ८०० रुपयांचा दंड आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी ४ जणांकडून ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.