मुंबई (वृत्तसंस्था) : २०२३ मधील आयपीएलच्या प्रत्येक सामन्यातून बीसीसीआयला ११८ कोटींचा फायदा होणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या २०२३ ते २०२७ या पाच वर्षांसाठीचे मीडिया राईट्स ४८,३९० कोटी रुपयांना विकले गेल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.

आता पुढील पाच वर्षांसाठी आयपीएलच्या प्रत्येक हंगामातील प्रत्येक सामन्यात फेकलेल्या एका चेंडूतून बीसीसीआयला ४९ लाख रुपये इतका फायदा होणार आहे. बीसीसीआयने २०१८-२२ च्या आधीच्या वर्षांमध्ये आयपीएलच्या एका सामन्यातून जवळपास ५५  कोटी रुपये इतके पैसे कमवले होते. यंदा भारतातील टीव्ही मीडिया राईट्सच्या शर्यतीत डिजनी स्टारने, तर डिजिटल हक्कांसाठी वायकॉम १८ ने बाजी मारली आहे. त्यामुळे टीव्हीवर आयपीएलचे सामने हे स्टार स्पोर्ट्सवरच दिसणार असून, ऑनलाईन सामने मात्र वूटवर पाहावे लागणार आहेत. याशिवाय पॅकेज सी ज्यामध्ये एका सीजनच्या १८ निवडक सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क असणार आहेत. ते वायकॉम १८ ने विकत घेतले आहे. याशिवाय परदेशात आयपीएल सामन्यांचे प्रसारण करण्यासाठीचे पॅकेज डी वायकॉम १८ आणि टाईम्स इंटरनेट यांनी मिळून विकत घेतले आहेत.

आयपीएलच्या पुढील पाच हंगामासाठी म्हणजेच २०२३ ते २०२७ या कालावधीत आयपीएल प्रसारण हक्कांसाठीची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. भारतीय उपखंडासाठी टीव्ही आणि डिजिटल हक्क, तसेच प्लेऑफच्या निवडक सामन्यांसाठीचे हक्क आणि परदेशात आयपीएळ सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क अशा एकूण चार पॅकेज्सची विक्री यावेळी झाली. हा संपूर्ण व्यवहार ४८ हजार ३९० कोटींमध्ये झाला आहे.

यावेळी टीव्हीसाठीचे हक्क डिजनी स्टारने आपल्याकडे कायम ठेवले. यासाठी त्यांनी २३ हजार ५७५ कोटी रुपये मोजले. डिजिटल प्लॅटफॉर्मसाठीचे हक्क २० हजार ५०० कोटींना वायकॉम १८ कंपनीला विकले गेले आहेत. आयपीएलच्या ४१० सामन्यांसाठी या हक्कांची विक्री झाल्याने एका सामन्यातून जवळपास १०७ कोटींची कमाई बीसीसीआय करणार आहे. यामध्ये टीव्हीच्या माध्यमातून एका सामन्यातून जवळपास ५७  कोटी, तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर एका सामन्यातून ५० कोटींची कमाई बीसीसीआय करणार आहे.