कोलकाता (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना आज (शनिवार) सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने दक्षिण कोलकाता येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून आज सायंकाळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. या वृत्तानंतर सौरव यांच्या चाहत्यांसह क्रिकेट रसिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली. त्यानंतर लगेचच त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला शुक्रवारी रात्रीपासूनच बरं वाटत नव्हतं. पण शनिवारी त्याने दैनंदिन वेळापत्रकानुसार काम करण्यास सुरूवात केली. सकाळी जिममध्ये व्यायाम करतानाच त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. डॉक्टर्स त्याच्यावर उपचार करत असून हृदयविकाराचा झटका आल्यानेच असं घडलं असल्याची शक्यता आहे. हे समजताच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्विट करत चिंता व्यक्त केली.