नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला चढवून अनेकांचे बळी घेतले, कोट्यवधींचे नुकसान केले. या वेळी देशभरात पाकिस्तानविरुद्ध अत्यंत संतापाची भावना असताना तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने या हल्ल्याचा निषेध करण्याशिवाय पाकिस्तानविरुद्ध कोणतीच कारवाई केली नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने असा कचखाऊपणा का दाखवला, याविषयी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी ‘अ प्रॉमिसड् लँड’ या आपल्या नव्या पुस्तकात अत्यंत धक्कादायक दावा केला आहे.

ओबामा यांचे पुस्तक त्यांच्या राजकीय भूमिकेवर अधिक केंद्रित आहे. राजकारणाच्या त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून ओसामा बिन लादेनच्या हत्येपर्यंत अनेक मुद्द्यांविषयी लिहिले आहे. ओबामा म्हणतात, २६/ ११ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग पाकिस्तानविरूद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. या त्यांच्या भूमिकेमुळे त्यांचे आणि काँग्रेसचे राजकीय नुकसान झाले. पाकिस्तानविरुद्ध कारवाई केल्यास आपल्या देशात मुस्लिमविरोधी भावना वाढेल अशी चिंता सिंग यांना होती. भाजप देशात मुस्लिमविरोधी भावना वाढवत आहे. म्हणूनच मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानविरूद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ केली. याचा राजकीय तोटा त्यांना पुढे सोसावा लागला.