कोल्हापूर (प्रतिनिधी) : दूधगंगा प्रकल्पातील निढोरी तसेच कूर शाखा कालवा यावरील नियोजित आवर्तन पूर्ण करण्यासाठी डिसेंबरमध्ये शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रांवर उपसाबंदी करण्यात आली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे (उत्तर) उपकार्यकारी अभियंत्यांनी दिली. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजना उपसाबंदीमधून वगळण्यात आल्या आहेत.

दूधगंगा उजवा कालव्यावरील (मुख्य कालवा) कि. मी. १ ते २४ पर्यंत राधानगरी तालुक्यातील ऐनी, आटेगांव, पंडेवाडी, सावर्डे-पाटणकर, कासारपुतळे, कासारवाडा, ढेंगेवाडी, धामणवाडी, सरवडे आणि कागल तालुक्यातील उंदरवाडी, बोरवडे या गावातील शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपसायंत्रांवर दि. १० डिसेंबर सकाळी ८ पासून ते १४ डिसेंबर सकाळी ८ पर्यंत उपसाबंदी लागू करण्यात आली आहे.

वरील कालावधीमध्ये पिण्याच्या पाणीपुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी (औद्योगिक व शेतीसाठी उपसाबंदी कालावधीत) अनधिकृत उपसा आढळून आल्यास उपसायंत्र जप्त करून उपसा परवाना १ वर्षासाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही.