मुंबई (प्रतिनिधी) : पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. थोरात यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, जर तरुणांना संधी मिळणार असेल, तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीवारीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले, मी राजीनामा देण्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो. दर महिन्याचे काही विषय असतात त्यावर चर्चा करण्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो. ज्यावेळी निवडणूक झाली, मंत्रिमंडळाचे गठन झाले. त्यावेळीच मी दिल्लीमध्ये जाऊन सांगितले होते की, मी प्रदेशाध्यक्ष आहे, महसूल मंत्री आहे, विधिमंडळ काँग्रेसचा नेताही आहे. माझ्याकडे या सर्व जबाबदाऱ्या आहेत. मी उत्तमरित्या सांभाळीन. पण तुम्हाला कधी वाटले की, यापैकी काही जबाबदाऱ्या इतर कोणाकडे सोपवायच्या आहेत, तर माझी त्याला हरकत नाही.