मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कामगिरीत सातत्य नाही असे विधान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले होते. यावर मंत्री यशोमती ठाकूर यांनी आघाडीतील पक्षांनी आघाडी धर्माचे पालन करावे, असा इशारा दिला होता. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही शरद पवार यांचेवर निशाणा साधला आहे. पवार हे राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले, असे त्यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, राहुल गांधींना पक्षात स्वीकारार्हता आहे, आमचे ते नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेस पुन्हा संघटित होते आहे. राहुल गांधींनी जीवनात जे दु:ख पाहिले, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही उभे राहून ते नेतृत्व करतायत. पुढील काळातही ते समर्थपणे नेतृत्व करणार आहेत. राहुल गांधी करत असलेल्या कामाच्या विरोधात भाजपच्या प्रचार यंत्रणा काम करतात. राहुल गांधी पुढची वाटचाल यशस्वी करणार आहेत. त्यावर आमचा विश्वास आहे. शरद पवारांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. मात्र ते राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं.