दिंडनेर्ली (प्रतिनिधी) :  प्रत्येक वर्षी ९ फेब्रुवारीला रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार आणि कामगार भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या वर्षीचा गुणवंत कामगार पुरस्कार एसटी चालक पदी कार्यरत असलेले करवीर तालुक्यातील दिंडनेर्लीतील बाळासाहेब कांबळे यांना २०१५ सालचा गुणवंत कामगार पुरस्कार महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

बाळासाहेब कांबळे हे  २००० सालापासून एसटी महामंडळाचे बस चालक म्हणून काम करत आहेत. त्यांना कोल्हापुर विभागातील  कामगार कल्याण मंडळाच्या गुणवंत कामगार पुरस्काराचे प्रथम (चालक) मानकरी होण्याचा मान मिळाला आहे. त्यांनी २००५ पासुन एसटीमध्ये प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, मोबाईल चार्जिंग सुविधा , वर्तमानपत्रे, १५० पुस्तकांचे फिरते वाचनालय, सुट्टे पैसे प्रथमोपचार पेटी, औषधे, कचरा पेटी, आदी सोई सुविधा उपलब्ध करून देत आहेत. तसेच वृक्षारोपण, झाडे वाटणे, पर्यावरण रक्षण,लेक वाचवा अभियान, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, रक्तदान, नेत्रदान, देहदान आदी सामाजिक कार्यात सहभाग घेत आहेत. त्यांनी आदर्श वाहनचालक बना अपघात टाळा हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना आतापर्यंत २७ संस्थांनी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले असून एसटी चालक म्हणून त्यांनी २० वर्षे विना अपघात सेवा बजावली आहे.

यावेळी कामगार राज्यमंत्री बच्चु कडु, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, विकास आयुक्त पंकज कुमार, कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित होते.