टोकियो (वृत्तसंस्था) : येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याने फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदकावर नाव कोरले आहे. काही मिनिटांपूर्वी त्याने डी. नियाझबेकोव्ह याला ८-० असे पराजित केले आहे. सुरुवातीपासून नियाझबेकोव्ह याच्यावर वर्चस्व मिळवत त्याला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. बजरंगने चुका टाळून आणि आक्रमण व बचाव याचा सुरेख मिलाफ साधत नियाझबेकोव्हला एकही गुण मिळू दिला नाही.

बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून ५-१२ ने पराभूत झाला. अलीयेवविरुद्धच्या सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटात बजरंगने एक गुणाने आघाडी घेतली होती. पण, अझरबैजानच्या पैलवानाने बजरंगवर वर्चस्व राखले. हाजी अलीयेव अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला आहे, त्यामुळे बजरंगला रेपेचेजद्वारे कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली.