मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे तब्बल तीन वर्षांच्या गॅपनंतर एक नवीन कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. ‘बाईपण भारी देवा’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. आज गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले असून, चित्रपटाची प्रदर्शित करण्याची तारीखही जाहीर केली आहे. पुढील वर्षी ६ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

केदार शिंदे यांनी चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करत कॅप्शनमध्ये लिहिले, आता करूया नवीन वर्षाची आनंददायी सुरूवात. आई, आजी, पत्नी, बहीण, सासू, मावशी आपल्या आयुष्यात असलेल्या या सर्व जीवाभावाच्या मैत्रिणींना समर्पित असलेला असा हा चित्रपट आहे.दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या खुमासदार शैलीने नटलेला हा चित्रपट येत्या नववर्षात ६ जानेवारी २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले यांनी केली असून, बेला शिंदे आणि अजित भुरे याचे सहनिर्माते आहेत.’घे डबल’ आणि ‘गोदावरी’ या दोन मराठी चित्रपटांच्या घोषणेनंतर, जिओ स्टुडिओजचा हा सलग तिसरा चित्रपट आहे.